युवकाची सागरी परिक्रमा--लोकमत विशेष--अभिषेक नार्वेकरकडून विक्रम : ६७८० किलोमीटरचा नऊ राज्यातून सागरी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:21 IST2017-12-22T22:19:29+5:302017-12-22T22:21:08+5:30
आंबोली : आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन विक्रम केला आहे.

युवकाची सागरी परिक्रमा--लोकमत विशेष--अभिषेक नार्वेकरकडून विक्रम : ६७८० किलोमीटरचा नऊ राज्यातून सागरी प्रवास
महादेव भिसे ।
आंबोली : आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन विक्रम केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग परिक्रमा त्याने सायकलने पार केली. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनारा जवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला.
दिव, दमण, पाँडेचेरी, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमधून त्याने प्रवास केला. यावेळी त्याला तब्बल तीन हजार किलोमीटर प्रवासामध्ये वादळ, वारा, पाऊस यांचा सामना करावा लागला. तरीही न डगमगता अभिषेकने हा टप्पा पार केला.
अभिषेक हा सावंतवाडी येथील आपले शिक्षण पूर्ण करून सध्या पुणे येथील एका पर्यटनाशी निगडित असलेल्या कंपनीमध्ये काम करतो. हे काम करत असताना त्याने यापूर्वीही मनाली ते श्रीनगर हा १०६५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक मोहिमा करण्याचे उद्दिष्ट त्याने डोळ्यासमोर ठेवले होते. त्यात या सागरी परिक्रमेचा समावेश होता. यापूर्वी अशा प्रकारची कोणीही केली नसल्याने त्याने ही मोहीम करण्याचे ठरवले. व ती बहात्तर दिवसांत पूर्णत्वासही नेली.यात अभिषेकने अथक परिश्रम घेतले व खडतर प्रवासातून ही मोहीम पूर्ण केली. त्याने रोज पस्तीस किलोमीटर सायकल चालवून सरावही केला होता.
७ सप्टेंबरला लखपत गुजरात येथून सुरू करून शंभर किलोमीटर सायकल चालवत त्याने हा टप्पा पार केला. त्याने शेवटचा समुद्रकिनारा पश्चिम बंगाल येथे सायकलने पार केला व मोहीम फत्ते केली. अभिषेकच्या या प्रवासाबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आठवण म्हणून वाळू आणली
खराब रस्ते, खराब हवामान या सर्वांवर मात करत अभिषेकने ही मोहीम यशस्वीरीत्या पार केली. स्वच्छतेचा संदेश देत अभिषेक ज्या ठिकाणी गेला त्या प्रत्येक ठिकाणी अभिषेकचे मनापासून स्वागत करण्यात आले.
तर अभिषेकने या मोहिमेची आठवण म्हणून त्याने ९ राज्यातील प्रत्येक समुद्र किनाºयावरील वाळू आठवण म्हणून सोबत आणली.
यावेळी अभिषेकने सांगितले की, या पुढील मोहीम ही संपूर्ण युरोप सायकलने फिरण्याची इच्छा आहे. अभिषेकने केलेल्या कामगिरीचे सिंधुदुर्गातून तसेच महाराष्ट्रभरातून कौतुक होत असून सिंधुदुर्गवासीयांनी त्याचे स्वागत करत पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.